Zakir Hussain passes away : तबल्यावर थिरकणाऱ्या ज्यांच्या बोटांच्या जादूने भल्या भल्यांनी तोंडात बोटे घातली आणि ज्यांच्या नाद माधुर्याची मोहिनी देश विदेशातील लाखो करोडो संगीतप्रेमींना पडली ते उस्तादोंके उस्ताद आणि भारताच्या संगीत क्षेत्रातील शान पद्मविभूषण उस्ताद जाकीर हुसैन आज रविवार दिनांक १५ डिसेंबर रोजी नादब्रम्हात लिन झाले. ते ७३ वर्षांचे होते.
मागील काही दिवसांपासून हृदयरोगासाठी त्यांच्यावर अमेरिकेत उपचार सुरू होते. त्यानंतर त्यांना अतिदक्षता विभागात भरती केले होते. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली आणि करोडो भारतीयांच्या हृदयाचा ठोका चुकला.
त्यांचा जन्म १९५१मध्ये झाला होता. जन्माला आल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून त्यांची संगीत साधना सुरू झाली होती. त्यांचे वडील उस्ताद अल्लारखा खाँ हे विख्यात तबलजी होती. छोट्या जाकीर यांना त्यांच्याकडे दिल्यावर त्यांनी प्रार्थना म्हणायची होती, पण त्याऐवजी त्यांनी त्यांच्या कानात तबल्याचा ठेका गुणगुणला. त्यामुळे जाकिर यांची आई नाराज झाली, तरी जाकीर यांचे वडील म्हणाले की हीच माझी खरी प्रार्थना आहे. हा किस्सा जाकीर हुसैन यांनी अनेकदा ऐकवला आहे.
एक अतिशय विनम्र आणि संगीत सेवेसाठी समर्पित व्यक्तीमत्व म्हणून ते प्रसिद्ध होते. ते लाघवी स्वभावाचे होते आणि वायुवेगाने त्यांची बोटे तबल्यावर थिरकत असत. आजतागायत त्यांनी अनेक संगीत मैफलींना आपल्या तबल्याच्या तालाचा साज चढवला होता. त्यांच्या जाण्याने भारतीय संगीत क्षेत्राची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे.
त्यांचे वडील उस्ताद अल्लारखा साहेब वारल्यानंतर त्यांनी पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना वडिलांच्या स्थानी मानले होतें आणि हिंदू रिवाजाप्रमाणे ते वडिलांच्या पुण्यतीथीला पंडितजी यांना वडिलांच्या खुर्चीत बसवून पूजन करायचे, ते सर्व धर्माच्या पलीकडे गेलेले व्यक्तीमत्व होते.