शरद पवार ग्रामसमृध्दी योजना राज्य योजना म्हणून राबविणार

शरद पवार ग्रामसमृध्दी योजना राज्य योजना म्हणून राबविणार

रोहयो आणि फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांची माहिती

मुंबई, दि. ५  : ग्रामीण भागातील कामाची मागणी करणाऱ्या प्रत्येक पात्र लाभार्थ्याला शरद पवार ग्रामसमृध्दी योजनेंतर्गत गाय व म्हैस यांच्याकरिता पक्का गोठा बांधणे, शेळीपालन शेड बांधणे, कुक्कुटपालन शेड बांधणे, भू-संजीवनी नाडेप कंपोस्टींग या कामांना सर्वोत्तम प्राधान्यक्रमाने सर्व ग्रामपंचायत क्षेत्रात राबविण्यात येणार असून शरद पवार ग्रामसमृध्दी योजनांना राज्य योजना म्हणून राबविण्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याचे रोहयो आणि फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितले.

रोहयो मंत्री श्री. भुमरे म्हणाले, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा मूळ उद्देश हा ग्रामीण भागातील व्यक्तींना अकुशल कामाची मागणी केल्यावर कामे उपलब्ध करून देणे व त्याव्दारे कायमस्वरूपी मत्ता निर्माण करणे हा आहे. मुलभत सुविधा कोणती द्यावी याकरिता शरद पवार ग्रामसमृध्दी योजना राज्य योजना म्हणून राबवून या अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गाय व म्हैस यांच्याकरिता पक्का गोठा बांधणे

गोठ्यातील ओबडधोबड जमिनीमुळे जनावरांपासून मिळणारे मौल्यवान मूत्र व शेण यांचा संचय करता न आल्यामुळे ते मोठ्या प्रमाणावर वाया जाते. जनावरांचे मूत्र व शेण हे एक उत्कृष्ट प्रकारचे सेंद्रीय खत असल्याने जनावरांच्या गोठ्यातील जागा ही सिमेंट काँक्रीटचा वापर करुन पक्क्या स्वरुपात सपाटीकरण केल्यास जनावरांपासून मिळणाऱ्या मूत्र व शेण गोठ्याशेजारील खड्ड्यामध्ये एकत्र जमा करुन त्याचा शेतजमिनीची सुपिकता व उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी उपयोग करुन घेता येणार आहे.

रोजगार हमी योजनेच्या परिपत्रकानुसार नरेगा अंतर्गत ७७ हजार १८८ इतका अंदाजित खर्च येणार आहे. त्यामध्ये अकुशल खर्च रु. ६ हजार १८८ रूपये (प्रमाण ८ टक्के) कुशल खर्च रु.७१,०००/- (प्रमाण ९२ टक्के)

एकूण रु.७७,१८८/- (प्रमाण १०० टक्के) असा असणार आहे.

ग्रामीण भागामध्ये शेळीपालन शेड बांधणे

शेळ्या-मेढ्यांपासून मिळणारे शेण, लेंड्या व मूत्र यापासून तयार होणाऱ्या उत्कृष्ट दर्जाच्या सेंद्रीय खतांचा पक्क्या स्वरुपाचे व चांगले गोठे नसल्याने नाश होतो. शेळ्या, मेंढ्याकरिता चांगल्या प्रतीचे शेड बांधून दिल्यास या जनावरांचे आरोग्य देखील चांगले राहणार असून वाया जाणारे मलमूत्र एकत्र करुन शेतीमध्ये उत्कृष्ट प्रकारचे सेंद्रीय खत म्हणून वापर करता येईल. यामुळे शेतीच्या सुपिकतेवरोबरच शेती उत्पादन वाढीवर चांगला परिणाम होऊन उदरनिर्वाहासाठी मदत होऊ शकेल.

रोजगार हमी योजनेच्या परिपत्रकानुसार नरेगा अंतर्गत ४९ हजार २८४ इतका खर्च येणार आहे.अकुशल खर्च  ४ हजार २८४ (प्रमाण ८%) कुशल खर्च ४५००० (प्रमाण ९२%) एकूण 77 हजार 188 (प्रमाण 100%) असा असणार आहे.

कुक्कुटपालन शेड बांधणे

परसातील कुक्कुटपालनामुळे ग्रामीण भागातील कुटुंबाना पूरक उत्पादनाबरोबरच आवश्यक पोषक प्राणीजन्य प्राथिनांचा पुरवठा होतो. खेड्यामध्ये कुक्कुटपक्षांना चांगल्या प्रतीचा निवारा उपलब्ध नसतो. त्यामुळे त्यांचे आरोग्य नेहमीच खालावलेले असते. कुक्कूटपक्ष्यांचे ऊन, पाऊस, परभक्षी जनावरे व वारंवार येणाऱ्या आजारांपासून संरक्षण करण्यासाठी चांगल्या प्रतीचा निवारा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. चांगल्या निवाऱ्यामुळे रात्रीच्या वेळी त्यांचे, पिल्लांचे व अंड्याचे परभक्षी प्राण्यांपासून सरंक्षण होण्यास मदत होणार आहे. रोजगार हमी योजनेच्या परिपत्रकानुसार नरेगा अंतर्गत एकूण ४९ हजार ७६० (१००%) खर्च येणार आहे. अकुशल ४ हजार ७६० (१०%),कुशल खर्च ४५००० (प्रमाण ९०%)असा खर्च येणार आहे.

भू-संजीवनी नाडेप कंपोस्टींग

जमिनीच्या आरोग्यात सुधारणा केल्यास कृषी उत्पादनात मोठ्या प्रमाणावर भर पडू शकते. शेतातील कचऱ्यावर कंपोस्टिंगद्वारे प्रक्रिया केल्यास त्यातील सेंद्रीय पदार्थ जैविक पध्दतीने, सूक्ष्म जीव तसेच गांडुळाव्दारे कुजून त्यापासून उत्तम प्रकारचे ह्यूमस सारखे सेंद्रीय कंपोस्ट खत तयार होते. या खताचा वापर शेतात मोठ्या प्रमाणावर केल्यास. जमिनीच्या आरोग्यात सुधारणा होऊन, कृषी उत्पादनात मोठी भर पडू शकते. अशा सेंद्रीय पदार्थात सर्वच प्रकारचे सूक्ष्म जीव मोठ्या प्रमाणावर असतात. योग्य परिस्थितीत या सूक्ष्म जीवांची संख्या वाढते आणि हे मोठ्या संख्येने असलेले सूक्ष्म जीव, सेंद्रीय पदार्थाचे विघटन झपाट्याने करतात यासाठी एकूण खर्च १० हजार ५३७ (प्रमाण १००%) अकुशल खर्च ४ हजार ४६ (प्रमाण ३८%), कुशल खर्च ६ हजार ४९१(प्रमाण ६२%) असा खर्च येणार आहे.

शेअर करा
Leave a Comment

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *