Nafed-NCCF onion Scam: नाफेड आणि एनसीसीएफच्या वतीने मूल्य स्थिरीकरण योजनेअंतर्गत जी कांदा खरेदी झाली, त्यात खरेदी करणाऱ्या काही शेतकरी उत्पादक कंपन्या आणि भ्रष्ट अधिकारी यांनी खरेदीत मोठा घोटाळा केला असून या घोटाळ्याची उच्चस्तरिय चौकशी व्हावी, तसेच सीबीआय किंवा इडीकडून चौकशी व्हावी अशी मागणी आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे केली आहे.
केंद्रीय कृषीमंत्री श्री. चौहान नाशिकच्या दौऱ्यावर असून अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभेच्या माध्यमातून शेतकरी नेते व संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती न्याहारकर यांच्यासह शेतकरी प्रतिनिधी संजय जाधव, गोरख संत, दिलीप गायकवाड यांनी नाफेड-एनसीसीएफ घोटाळ्याची (onion scam) चौकशी करण्यासह कांदा निर्यात शुल्काची अट काढून टाकण्याची विनंती केली. दरम्यान कृषी मंत्र्यांनी त्यांची बाजू समजावून घेऊन यासंदर्भात कठोर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
Kanda Bajarbhav today: केंद्रीय कृषीमंत्री नाशकात असताना कांद्याला काय दर मिळाला
नाफेड-एनसीसीएफच्या अंतर्गत काही शेतकरी उत्पादक कंपन्यांनी शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करणे अपेक्षित होते, मात्र त्यांनी व्यापाऱ्यांकडून कमी दर्जाचा कांदा खरेदी केला व भाव वाढल्यानंतर विकून टाकला. तसेच काही कांद्याला शेतकऱ्यांचा कांदा दाखवला आणि त्यातून काही हजारा कोटींचा घोटाळा झाला. त्यामुळे शेतकरी, ग्राहक आणि सरकार तिघांचीही फसवणूक झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे असून या प्रकरणाची दखल घेऊन सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणीही या निवेदनाद्वारे केली आहे.
Onion export duty: कांदा निर्यातशुल्क काढण्यासाठी निर्यातदारांचे कृषीमंत्र्यांना साकडे
याशिवाय सध्या कांद्याचे बाजारभाव अतिरिक्त आवकेमुळे पडत असून २० टक्के कांदा निर्यातशुल्क हटवावे असेही या निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर निवृत्ती न्याहारकर, संजय गायकवाड, संदिप काळे पाटील, शशिकांत शिंदे, दिलीप गायकवाड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
कसा होतो कांदा घोटाळा, व्हिडिओ सौजन्य: ॲग्रो शिवार