Nafed kanda kharedi 2025

Nafed Kanda kharedi: नाफेडची ट्रायल कांदा खरेदी सुरू; कृषीमंत्री करणार नियमित खरेदीचा शुभारंभ?

Nafed kanda kharedi 2025 date: गेल्या महिनाभरापासून नाफेड आणि एनसीसीएफच्या कांदा खरेदीची वाट पाहून वैतागलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी या आठवड्यात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. यासंदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज दिनांक १६ जूनपासून ट्रायल खरेदी सुरू होत असून दिनांक २० जूनपासून नियमित खरेदी सुरू होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते या खरेदीचा शुभारंभ होण्याची चर्चा आहे.

कांदा खरेदीत सुमारे दोन हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप नाफेड आणि एनसीसीएफवर मोठ्याप्रमाणात झाल्यानंतर यंदापासून ही सरकारी खरेदी अधिक पारदर्शक आणि अधिक कडक नियमांनुसार होईल अशी अपेक्षा होती. त्यानुसार प्रक्रिया सुरू झाली मात्र मागील वर्षी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते, त्यांनी नाव बदलून सहकारी सोसायटीच्या माध्यमातून पुन्हा खरेदी प्रक्रियेत भाग घेतला आणि राजकीय संबंध वापरून खरेदी यादीत नाव आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शेतकरी संघटनांसह राजकीय पदाधिकाऱ्यांनीही केला होता. त्यानंतर ही यादी पुन्हा बदलण्यात येऊन अन्य १५ सोसायट्यांना हे कंत्राट देण्यात आले. त्यामुळे प्रक्रियेत उशीर झाला आणि मे महिन्यात सुरू होणारी खरेदी लांबली.

शेतकऱ्यांसाठी नोंदणी सुरू, पण पोर्टलवर अडचणी

मागील सोमवारपासून म्हणजेच 9 जूनपासून नाफेडची कांदा खरेदीची नोंदणी पोर्टलवर सुरू करण्यात आली होती. मात्र सध्या तरी रजिस्ट्रेशन केल्यानंतर लॉगिन आणि पासवर्ड टाकून शेतकऱ्यांना पुन्हा पोर्टलवर प्रवेश करता येत नसल्याची तक्रार महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयदीप भदाणे यांनी केली आहे. श्री. भदाणे यांनी स्वत: नोंदणी केल्यानंतरचा अनुभव सांगितला असून त्यानुसार त्यांना नोंदणी केल्यानंतर पु न्हा लॉगिन करण्यात अडचणी येत असल्याचे दिसत आहे.

अशी होते प्रायोगिक कांदा खरेदी

आता नाफेड तर्फे नव्या खरेदीदारांची यादी तयार झाल्याची माहिती नाफेडच्या अंतर्गत सूत्रांनी दिली असून आजपासून ट्रायल कांदा खरेदी प्रक्रिया सुरू होत आहे. यात निवडक शेतकऱ्यांना बोलावून त्यांचा कांदा खरेदी केला जातो. वजन करण्यापासून तर खरेदीची पोर्टलवर नोंद करण्यापर्यंत सर्व प्रक्रिया व्यवस्थित होतेय ना याची खात्री केली जाते. त्यात काही त्रुटी राहिल्या तर त्या दुरुस्त केल्या जाता. जेणे करून मोठ्या प्रमाणावर नियमित कांदा खरेदी सुरू झाल्यावर त्यात अडथळे येऊ नयेत. या प्रक्रियेनंतर नियमित खरेदी सुरू होईल.

२० जूनला नियमित खरेदी?

नाफेडची नियमित कांदा खरेदी २० जूनपासून सुरू होणार असल्याचे समजत असून त्यासाठी केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान उपस्थित राहण्याची चर्चा आहे. केंद्रीय मंत्री नाशिकला पिंपळगाव किंवा लासलगाव येथून खरेदीचा शुभारंभ करू शकतात असे सांगण्यात येत आहे. नाफेड प्रक्रियेतील काही सहकारी सोसायट्यांच्या सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार मागच्या वर्षी केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांच्या हस्ते ही खरेदी झाली होती, त्याच धर्तीवर यंदाही मंत्र्यांच्या हस्ते खरेदीचा शुभारंभ करून त्याचे श्रेय घेण्याचा प्रकार होऊ शकतो. अर्थात कृषीमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईनही खरेदी होऊ शकते असेही सांगण्यात येत असले, तरी त्याबाबत अजून खात्रीदायक माहिती मिळालेली नाही.

दरम्यान यंदा नाफेड सोबतच एनसीसीएफची खरेदी लांबली असून तिलाही याच आठवड्यात प्रारंभ होऊ शकतो. तसे झाल्यास या आठवड्यात एकट्या नाशिक जिल्ह्यातून २ लाख ४० हजार आणि महाराष्ट्रातून २ लाख ६० हजार मे. टन कांदा खरेदी होईल. उर्वरित ४० हजार मे. टन कांदा खरेदी ही मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान आणि कर्नाटक येथून होणार आहे.

शेअर करा
Leave a Comment

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *