Krishi salla : crop care for rabi, sugarcane and turmeric: मराठवाडयातील उत्तर भागात दिनांक 06 व 07 जानेवारी रोजी धुके राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात दोन दिवसानंतर कमाल तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे तर किमान तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 03 ते 09 जानेवारी 2025 दरम्यान पावसाची शक्यता नाही, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी व दिनांक 10 ते 16 जानेवारी 2025 दरम्यान पावसाची शक्यता नाही, कमाल तापमान सरासरीएवढे व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. अशी शिफारस वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने केली आहे.
ऊसासह पीक व्यवस्थापन
Sugarcane krishi salla पूर्व हंगामी ऊसाची लागवड करून सहा ते आठ आठवडे झाले असल्यास 260 किलो युरिया प्रति हेक्टरी देऊन पाणी द्यावे. नविन लागवड केलेल्या ऊस पिकात खूरपणी करून तण नियंत्रण करावे. ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
ऊस पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30 % 36 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
हळद पिकाची अशी घ्या काळजी
Halad Krishisalla; हळद पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 15 मिली यापैकी एका किटकनाशकाची प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून फवारणी करावी. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत).
उघड्या पडलेल्या कंदाजवळ कंदमाशीची मादी अंडी घालते त्यामूळे, उघडे पडलेल कंद मातीने झाकून घ्यावेत व वेळेवर हळदीची भरणी करावी. प्रति बंधात्मक उपाय म्हणून एक महिन्याच अंतराने प्रत्येक महीन्यात जमिनीतून क्लोरोपायरीफॉस 50% 50 मिली प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे आळवणी करावी.
हळदीच्या पानावरील ठिपके / करपा रोग याच्या व्यवस्थापनासाठी अझोक्सिस्ट्रॅाबिन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% (पुर्वमिश्रित बुरशीनाशक) 10 मिली + 5 मिली स्टीकरसह प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. करपाजन्य रोगग्रस्त पाने वेळोवेळी जमा करून नष्ट करावीत. हरभरा पिकास आवश्यकतेनूसार तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.
हरभरा (Harbhara krishi salla)
हरभरा पिकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. ढगाळ वातावरणामूळे हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थानासाठी शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे प्रति एकर 20 पक्षी थांबे लावावेत व घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी 2 कामगंध सापळे लावावेत.
हरभरा पिकात घाटे अळीच्या व्यवस्थानासाठी 5% (एनएसकेई) निंबोळी अर्क किंवा क्विनॉलफॉस 25% इसी 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा असिफेट 75% 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. करडई पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.
फळबागेचे व्यवस्थापन
मृग बहार धरलेल्या संत्रा/मोसंबी बागेत फळ वाढीसाठी 00:52:34 15 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. अंबे बहार धरलेल्या संत्रा/मोसंबी बागेत वाळलेल्या व रोगग्रस्त फांद्याची छाटणी करावी व छाटणी केलेल्या फांद्यावर बोर्डो पेस्ट लावावी. संत्रा/मोसंबी बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. संत्रा/मोसंबी बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस असलेल्या डाळींब फळांची काढणी करून घ्यावी. चिकू बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे व आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.
भाजीपाला
वांगे भाजीपाला पिकात शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास प्रादूर्भाव ग्रस्त शेंडे व फळे गोळा करून नष्ट करावेत व त्याच्या व्यवस्थापनासाठी शेतात एकरी 2 कामगंध सापळे लावावेत किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% एससी 4 मिली किंवा क्लोरपायरीफॉस 20% एससी 20 मिली किंवा सायपरमेथ्रीन 10% ईसी 11 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
मिरची व गवार पिकावर पावडरी मिल्ड्यू रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मायक्लोब्यूटॅनिल 10% डब्ल्यूपी 10 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. भाजीपाला पिकात खूरपणी करून भाजीपाला पिक तण विरहीत ठेवावे व आवश्यकतेनूसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची पिकाची काढणी करून घ्यावी.
फुलशेती
फुल पिकात खूरपणी करून फुल पिक तण विरहीत ठेवावेत व आवश्यकतेनूसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून घ्यावी.
तुती रेशीम उद्योग
तुती बागेस सहा महिन्याच्या अंतराने 4 टन कुजलेले शेणखत आणि 2 टन गांडूळ खत प्रति एकर याप्रमाणे द्यावे. रासायनिक खत नत्र-अमोनियम सल्फेट खतामधून 140 किग्रॅ सींगल सुपर फॉस्फेट 70 किग्रॅ आणि म्यूरेट ऑफ पोटॅश 19 किलो प्रति कोषाचे पीक या प्रमाणे द्यावे. त्याचबरोबर 1.6 किग्रॅ सेरीआयझो आणि 0.4 किग्रॅ सेरीफॉस 150 ते 200 किग्रॅ कुजलेल्या शेणखतात मिश्रण करून सरीतून द्यावे. वर्षातून दोन वेळा जुन आणि जानेवारी महिन्यात ढेंचा किंवा बरू हे द्विदल हिरवळीचे पीके 8 किलो बियाणे प्रति एकर याप्रमाणे पट्टा पध्दतीत तुती बागेत पेरून 40-45 दिवसांनी फुलोरा येण्या अगोदर हिरवळीची पीके जमिनीत नांगराच्या सहाय्याने गाडून टाकावीत.
पशुधन व्यवस्थापन
थंडीच्या दिवसात जेव्हा थंड वारे वाहू लागतात त्या वेळेस आपल्या जनावरांचे विशेषत: शेळी आणि मेंढी यांचे थंडीपासून संरक्षण करावे. त्याकरीता त्यांच्या निवाऱ्याच्या जागेत ऊब असावी, माफक प्रमाणात हवा खेळती असावी. थंडीच्या दिवसात करडांची मरतुक टाळण्यासाठी त्यांना ऊबदार जागेत ठेवावे.
मोठ्या टोपलीत कापड टाकून त्यामध्ये पिल्लांना ठेवता येऊ शकते, थंडीपासून संरक्षण होते. गोठ्यात माफक हवा असावी. शेळीचे दुध भरपूर प्रमाणात द्यावे ज्यामूळे पिल्लांच्या शरीरात ऊर्जा निर्माण होऊन थंडीपासून बाधा होणार नाही.