Krishi Salla: या आठवड्याचा कृषी सल्ला

Krishi Salla: या आठवड्याचा कृषी सल्ला

krishi salla agro advisory for this week पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता असल्यामूळे व बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला असल्यामूळे पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारस केली आहे.

पीक व्‍यवस्‍थापन

ऊस पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ऊस पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30 % 36 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

हळद पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 15 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून फवारणी करावी. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत). उघडे पडलेल कंद मातीने झाकून घ्यावेत.

हळदीच्या पानावरील ‍ठिपके / करपा रोग याच्या व्यवस्थापनासाठी अझोक्सिस्ट्रॅाबिन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% (पुर्वमिश्रित बुरशीनाशक) 10 मिली + 5 मिली स्टीकरसह प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

हरभरा पिकास आवश्यकतेनूसार तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. ढगाळ वातावरणामूळे हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थानासाठी शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे प्रति एकर 20 पक्षी थांबे लावावेत व घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी 2 कामगंध सापळे लावावेत.

हरभरा पिकात घाटे अळीच्या व्यवस्थानासाठी 5% (एनएसकेई) निंबोळी अर्क किंवा क्विनॉलफॉस 25% इसी 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हरभरा पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.

किमान तापमानात झालेल्या घटीमूळे, करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा असिफेट 75% 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

करडई पिकात तणांच्या प्रादूर्भावानूसार पेरणीनंतर 25 ते 50 दिवसापर्यंत एक ते दोन कोळपण्या व खूरपण्या घ्याव्यात. बागायती करडई पिकाची पेरणी करून एक महिना झाला असल्यास 65 किलो यूरिया प्रति हेक्टरी देऊन पाणी द्यावे.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

मृग बहार धरलेल्या संत्रा/मोसंबी बागेत फळ वाढीसाठी जिब्रॅलिक ॲसिड 1.5 ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. संत्रा/मोसंबी बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. संत्रा/मोसंबी बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस असलेल्या डाळींब फळांची काढणी करून घ्यावी. चिकू बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे व आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.

भाजीपाला

मागील काही दिवसात ढगाळ वातावरणामूळे भाजीपाला (मिरची, वांगे व भेंडी) पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मिरची व गवार पिकावर पावडरी मिल्ड्यू रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मायक्लोब्यूटॅनिल 10% डब्ल्यूपी 10 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भाजीपाला पिकात खूरपणी करून तण विरहीत ठेवावे व आवश्यकतेनूसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची पिकाची काढणी करून घ्यावी.

फुलशेती

फुल पिकात खूरपणी करून तण विरहीत ठेवावेत व आवश्यकतेनूसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून घ्यावी.

तुती रेशीम उद्योग

हिवाळ्यात तुती बागेत बिहार हेरी या अळीचा प्रादूर्भाव होतो पानाच्या खालील बाजूस असंख्य अळ्या एकाच फांदीवर दिसतात. पानाहीत हीरतद्रव्य खाऊन फक्त पानाच्या शिरा शिल्लक ठेवतात. भौतीक नियंत्रण पध्दती करीता कोणतेही किटकनाशक न वापरता या अळीची पानाच्या खालच्या बाजूची अंडी ओळखून नष्ट करावीत. प्रादूर्भावग्रस्त फांदी सिकेटच्या साहाय्याने अलगद पणे कट करून जाळून टाकावी किंवा जमीनीत गाडून टाकावीत. पानावर पांढऱ्या रंगाचे ठिपके म्हणजे भुरी रोग प्रादूर्भाव दिसत असेल तर 0.2 टक्के बाव्हेस्टीन (कार्बेन्डेझीम) या बुरशीनाशकाची तुती बागेवर फवारणी करावी 5 ते 6 दिवसांनी तुती पाने किटकास खाद्य म्हणून देता येईल.

पशुधन व्यवस्थापन

बदललेल्या हवामानानूसार दूध उत्पादनावरील पशूधन आणि अन्य प्राण्याच्या व्यवस्थापनावर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे, दुधावरील जनावरांना योग्य प्रमाणात खनिज द्राव्याचे मिश्रण द्यावे. पशुवैद्यकाच्या सल्ल्याने योग्य वेळी जंतनाशकाची औषधे देण्यात यावी. थंडी पासुन पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी पशुधनास मोकळया जागी न बांधता गोठ्यात बांधावेत.

शेअर करा
Leave a Comment

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *