कमी खर्चाचा किफायतशीर व्‍यवसाय शेळीपालन

कमी खर्चाचा किफायतशीर व्‍यवसाय शेळीपालन

शेळीपालन हा व्‍यवसाय कमी खर्चाचा व बहुउददेशीय आहे. इतर मोठया जनावरांच्‍या तुलनेत शेळी पालनासाठी कमी खर्च लागतो. कारण हा प्राणी कुठल्‍याही, सहज उपलब्‍ध होणा-या वनस्‍पतीवर जगतो. जी इतर जनावरे सहसा खाणार नाहीत. शेळीपासून दुध, मांस, कातडी, केसापासून लोकर व खत ही उत्‍पादने मिळतात. हा प्राणी काटक असल्‍यामुळे रोगराईचे प्रमाण कमी असते. तेव्‍हा शेळीपालन व्‍यवसाय अनेक दृष्‍टीने फायदेशीर आहे. मराठवाडयात उस्‍मानाबादी ही जात तर पश्चिम महाराष्‍ट्रात संगमनेरी ही जात प्रसिध्‍द आहे.

शेळयांचे प्रजनन : 

शेळया साधारणत: जून, जुलै, ऑक्‍टोबर – नोव्‍हेंबर व फेब्रुबारी – मार्च या काळात माजावर येतात. साधारणत: 8 – 9 महिन्‍यात प्रथम माजावर येतात, परंतु वयाच्‍या 12 महिन्‍यापर्यंत त्‍यांना भरवून घेऊ नये. शेळयांना गाभण काळ 145 – 150 दिवसांचा असतो. प्रजननासाठी बोकडाचे वय 16 – 18 महिन्‍यांचे असावे व 20 – 25 शेळयांसाठी एक बोकड ठेवावा. गाभण काळात गर्भाची वाढ व तिचे स्‍वत:चे पोषण होण्‍यासाठी शेळीस अधिक सकस चारा व खाद्य देणे आवश्‍यक आहे. विण्‍यापुर्वी एक महिना तिचे दुध काढणे बंद करावे व त्‍या काळात 200 – 250 ग्रॅम खाद्य द्यावे.

\"\"

करंडाचे संगोपन :

नवीन जन्‍मलेल्‍या पिलांना त्‍यांच्‍या आईचे दूध (चीक) जन्‍मल्‍यानंतर 1 – 2 तासांच्‍या आत पाजवावे. या कच्‍च्‍या दूधात प्रथिने, जीवनसत्‍वे आणि क्षार यांचे प्रमाण जास्‍त असते. रोगप्रतिकारक शक्‍तीदेखील असते. अडीच महिन्‍यापर्यंत दूध पाजविणे आवश्‍यक आहे. करडे दीड महिन्‍याचे झाल्‍यावर त्‍यास थोडा कोवळा चारा देण्‍यास सुरुवात करावी. अडिच महिन्‍यानंतर हळूहळू दुधाचे प्रमाण कमी करुन पूर्ण बंद करावे. तीन महिन्‍यानंतर करडे त्‍याच्‍या आईपासून पूर्ण वेगळे करावे. लहान करडाचा गोठा स्‍वच्‍छ, कोरडा व हवेशीर असावा. त्‍यांचे थंडीपासून विशेषत: हिवाळयात जन्‍मलेल्‍या करडाचे पूर्ण संरक्षण करावे. सुरुवातीस त्‍याची वाढ चांगली व निकोप झाल्‍यास पुढे फायदेशीर राहतात. लहान करडांना प्रतिदिन 125 ते 150 ग्रॅम हिरवा चारा व 200 – 250 ग्रॅम वाळलेला चारा द्यावा. तसेच 100 ते 125 ग्रॅम खुराक द्यावा.

\"\"

 शेळयांची निगा :

पाठी वयाच्‍या 8 ते 10 महिन्‍यांत माजावर येतात. पण एक वर्षाच्‍या पारडीलाच फळवावे. जेणेकरुन जोमदार करडे पैदा होतील व ती जास्‍त दूध देतील. सर्वसाधारणपणे शेळया पावसाळयात जुलै- ऑगस्‍ट, हिवाळयात ऑक्‍टोबर – नोव्‍हेंबर आणि उन्‍हाळयात मार्च – एप्रिलमध्‍ये फळतात. शेळया 18 – 20 दिवसांनी माजावर येतात. गर्भकाळ 5 महिन्‍यांचा असतो. शेळी 15 ते 16 महिन्‍यांत दोनदा विेते. गाभण शेळया शेवटच्‍या महिन्‍यात वेगळया ठेवून रोज 250 – 300 ग्रॅम प्रथिनेयुक्‍त खुराक, हिरव्‍या चा-यासोबत द्यावा. शेळयांचे गोठे ओलसर, दमट असू नयेत, ते कोरडे, हवेशीर व सोपे असावेत. प्रत्‍येक शेळीस गोठयात 10 चौरस फुट व मोकळी 20 चौ. फूट जागा असावी. 30 x 20 फूटाच्‍या गोठयात 60 शेळया चांगल्‍या ठेवता येतात. गोठयाच्‍या दोन्‍ही बाजूस तितकीच जागा ठेवून कुंपण घालावे. मोकळया जागेत जाळीदार कपाट चा-यासाठी करावे आणि स्‍वच्‍छ पाण्‍याची सोय करावी. शेळयांच्‍या अंगावर व गोठयात मॅलॅथिऑन फवारणी करवी. तसेच दर 3 महिन्‍यांनी जंताचे औषध द्यावे.

\"\"

शेळयांचे खाद्य :

शेळयांना कुठल्‍याही प्रकारचा झाडपाला चालतो. त्‍यांना लहान झाडाझुडपांची पाने खावयास फार आवडतात. झाडाची कोवळी पाने, कोवळया फांद्या व शेगां त्‍या आवडीने खातात. शेळीला तिच्‍या वजनाच्‍या 3 – 4 टक्‍के शुष्‍क पदार्थ खाद्यातून मिळावयास पाहिजेत. या दृष्‍टीने एक प्रौढ शेळीस दररोज साधारण सव्‍वा ते अडीच किलो हिरवा चारा. 400 – 500 ग्रॅम वाळलेला चारा व प्रथिनांच्‍या पुर्ततेसाठी 250 – 300 ग्रॅम खुराक प्रतिदिन द्यावा. शेळयांना शेवरी, हादगा, धावडा, चिंच, जांभूळ, पिंपळ, बोर, वड, अंजन, चंदन, आपटा, सुबाभूळ, दशरथ, त्‍याशिवाय, मका, लसून, घास, बरसीम इ. प्रकारचा चारा देता येतो.

\"\"

बंदिस्‍त शेळीपालन :

चराऊ क्षेत्र व पडीत क्षेत्र आज कमी झाल्‍यामुळे शेळया मोकळया चरावयास सोडणे कठीण झालेले आहे. तसेच वनसंवर्धन व वनसंरक्षण यास महत्‍व दिले जात असल्‍यामुळे मोकळया सोडलेल्‍या शेळया वनाचा नाश करतात. त्‍यांच्‍यापासून संरक्षण म्‍हणून बंदिस्‍त शेळीपालन ही आजची गरज ठरलेली आहे. या पध्‍दतीत शेळयांना गोठयाचा आकार शेळयांच्या संख्‍येनुसार असतो. गोठयाच्‍या आतील जागा प्रत्‍येक शेळीस 9 चौरस फुट किंवा 1 चौरस मीटर लागते तर गोठयाच्‍या बाहेरील भागात 18 चौरस फुट किंवा 2 चौरस मीटर जागा लागते. बाहेरील जागेभोवती तारेचे कुंपण लावून द्यावे. गोठयाची लांबी पूर्व – पश्चिम असून मध्‍य भागी गोठयाचे छप्‍पर उंच ठेवावे व दोन्‍ही बाजूस उतरते असावे. गोठयाच्‍या आत जमिनीपासून 1 ते 1.5 फुट उंचीवर गव्‍हाण असावी. पाण्‍याची व्‍यवस्‍था गोठयाच्‍या बाहेरील हौद किंवा सिमेंटचे अर्धेपाईप ठेवून करावी. बोकडांचा गोठा वेगळा असावा.

शेअर करा
Leave a Comment

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *