निर्यातमूल्य काढण्याच्या मागणीसाठी लासलगावला कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे आंदोलन
Kanda bajarbhav: सोमवार दिनांक १३ जानेवारी रोजी सकाळच्या सत्रात लासलगाव बाजारात कांद्याचे लिलाव सुरू होताच संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलन करून हे लिलाव बंद पाडले. येथील बाजारसमितीत महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटनेमार्फेत आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे (Bharat Dighole) यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडत आंदोलन केले. सध्या कांदा निर्यातीवर निर्यात शुल्कामुळे बंधने येत आहे. त्यामुळे हे निर्यातशुल्क केंद्र सरकारने हटविले, तर शेतकऱ्यांचे कांदा बाजारभाव वाढून त्यांना चार पैसे जास्त मिळतील. त्यामुळे हे निर्यातशुल्क त्वरीत हटवावे अशी शेतकरी संघटनेची मागणी आहे. सुमारे एक हजाराहून अधिक कांदा उत्पादकांनी आंदोलनात सहभागी सरकारच्या धोरणाविरोधात संताप व्यक्त केला.
या संदर्भात कृषी २४ शी बोलताना कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे म्हणाले, की मागील का दिवसांपासून कांद्याचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात पडले असून सध्या १२ ते १५ रुपयांना कांदा खरेदी होत आहे. त्यातून शेतकऱ्यांचा कांदा उत्पादनाचा खर्चही निघणे अवघड आहे. केंद्र सरकार जेव्हा गरज असते, तेव्हा एका रात्रीत निर्यातीवर बंधने आणून शेतकऱ्यांचे भाव पाडते, तशी शेतकऱ्यांना गरज असेल, तर कांदा निर्यातीवरील बंधने का दूर करत नाहीत, असा सवालही त्यांनी विचारला.
यावेळी भारत दिघोळे, केदारनाथ नवले, विलास गांगुर्डे या पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांच्या वतीने बाजारसमितीचे सचिव आणि पदाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या वतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले. दरम्यान या आंदोलनामुळे सकाळच्या सत्रातील कांदा लिलाव काही काळ बंद ठेवण्यात आले होते.