लोहाची कमतरता आहे? स्वयंपाकघरातील पदार्थ तुम्हाला देतील लोहाची मात्रा!

तुम्हाला धाप लागतेय? छातीत दुखतंय? चक्कर येतेय? मग रक्तातील हिमोग्लोबिनची तपासणी करा. हिमोग्लोबिन कमी असल्यास घाबरून जाऊ नका. आपल्या घरात असलेले पदार्थ पुरेशा प्रमाणात खा. आपला आहार असा असावा की, ज्यामधून शरीराला आवश्यक असलेले घटक पुरेशा प्रमाणात मिळू शकतात. लोह हा असाच एक आवश्यक घटक आहे. हा घटक शरीराला निरोगी ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक मानला जातो. लोहाच्या कमतरतेमुळे शरीरात निरोगी लाल रक्तपेशींची कमतरता निर्माण होते, ज्यामुळे हिमोग्लोबिनची कमतरता निर्माण होऊ शकते. हिमोग्लोबिनची कमतरता असल्यास शरीरात अशक्तपणासह इतर अनेक गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

या समस्या टाळण्यासाठी आहारात लोहाची दैनंदिन गरज भागू शकेल, असे पदार्थ नियति असावेत. मासिक पाळी, गर्भधारणा किंवा रजोनिवृत्ती यादरम्यान महिलांमध्ये लोहाची कमतरता निर्माण होणे ही गोष्ट सामान्य मानली जाते. त्यामुळेच छातीत दुखणे, धाप लागणे, चक्कर येणे आणि हात/पाय थंड होऊ शकतात. अशावेळी काय खायला हवे-

लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी गूळ खाणे विशेष फायदेशीर आहे. गूळ शरीरासाठी वनस्पती-आधारित साखरेचा उत्कृष्ट स्त्रोत मानला जातो. रोजच्या आहारात गुळाचा समावेश केल्यास सर्व प्रकारच्या गंभीर आरोग्य समस्यांवर मात करता येते. एवढेच नाही, तर लोहाची गरज पूर्ण करण्यासाठी गूळ खाणे देखील चांगले मानले जाते. हरभरा गुळाबरोबर खाणे हा तुमच्यासाठी आणखी चांगला पर्याय असू शकतो.

करवंद खाणे हेही उपयुक्त आहे. तसेच आवळ्याचे सेवनही करायला हवे. क जीवनसत्त्व मिळविण्यासाठी आवळा खाल्ला जातो. पण त्याबरोबरच आवळा लोह आणि कॅल्शियमसारख्या पोषक तत्वांनीही युक्त आहे. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह असल्यामुळे अॅनिमिया बरा होण्यास मदत होते. हे लोणचे, कँडी किंवा मुरंबा यासह विविध स्वरूपात सेवन केले जाऊ शकते. आपण आवळा उकळून कच्चाही खाऊ शकतो. तसेच मनुका खाणेही खूप फायदेशीर आहे

बहुतेक सुकामेवा लोहाचे चांगले स्त्रोत आहेत, पण त्यातही मनुके अधिक फायदेशीर मानले जातात. बेदाण्यामध्ये लोह, तांबे आणि इतर अनेक जीवनसत्त्वे देखील भरपूर असतात, जे रक्त पेशींच्या निर्मितीसाठी उपयुक्त मानले जातात. आठ ते दहा मनुके रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी खा. असे करणे आरोग्यासाठी विशेषतः फायदेशीर ठरू शकते.

शेअर करा