शनिवारपासून राज्यातील बाजारसमित्यांमध्ये येणाऱ्या कांद्याच्या आवकेत घट झाली असून रविवारी दिनांक १३ एप्रिल रोजी तर कांदा आवक अगदी नगण्य झाली. मात्र तरीही बाजारभाव वाढण्याऐवजी ते घटतच चालल्याने शेतकऱ्यांची काळजी वाढली आहे
सध्या देशभरात कांद्याचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात घसरले असताना, केंद्र सरकारकडून घेतला जाणारा एक निर्णय कांद्याचे दर पुन्हा वाढवू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. कांद्याच्या वाढलेल्या उत्पादनामुळे आणि जागतिक बाजारातील स्पर्धेमुळे भारतातील शेतकरी आणि निर्यातदार अडचणीत आले आहेत. यामुळे कांद्याच्या निर्यातीसाठी (onion export incentive) प्रोत्साहन वाढवण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
नुकतेच निर्यातदारांच्या फलोत्पादन निर्यातदार संघटनेने सरकारकडे RoDTEP म्हणजेच ‘निर्यातीत उत्पादित वस्तूंवरील कर आणि शुल्क सवलत’ योजनेअंतर्गत कांद्याचा सवलतीचा दर सध्या असलेल्या पेक्षा वाढवून ५ टक्क्यांपर्यंत करावा, अशी विनंती केली आहे.
संघटनेच्या मते, सध्या भारतात कांद्याचे उत्पादन भरपूर झाले असून, त्याचवेळी आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याचे दर खाली आले आहेत. मागील काही वर्षांत भारताने कांद्यावर वेळोवेळी निर्यातबंदी लादल्याने जागतिक बाजारात भारताची विश्वासार्हता कमी झाली आहे आणि इतर देशांनी त्या संधीचा फायदा घेतला आहे. परिणामी, भारतीय निर्यातदारांना आता पूर्वीपेक्षा अधिक स्पर्धेचा सामना करावा लागत आहे.
जर RoDTEP दर वाढविण्यात आला, तर निर्यात वाढून देशांतर्गत पुरवठ्याचा ताण कमी होईल आणि बाजारात दर सुधारण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांना अधिक चांगला भाव मिळेल, तर निर्यातदारही परदेशी बाजारात पुन्हा जोरदार पाय रोवू शकतील. शिवाय, भारताच्या परकीय चलन कमाईतही वाढ होईल.
कांदा निर्यातदारांनी सरकारकडे विनंती करताना सांगितले आहे की, वेळेत योग्य पावले उचलल्यास ही तात्पुरती अडचण दूर होऊन भारत पुन्हा एकदा आघाडीचा कांदा निर्यातदार देश म्हणून ओळखला जाईल.