kanda bajarbhav

रब्बीचा कांदा जास्त; लोकसभा आणि विधानसभेत कांदा प्रश्न पेटला? निर्यात शुल्क रद्द होणार?

नाशिक, ता. १० : यंदा देशात रब्बी हंगामात १०. २६ लाख हेक्टर कांदा लागवड झाली असून एकट्या महाराष्ट्रात त्यापैकी साडेपाच लाख हेक्टरपेक्षा जास्त कांदा आहे. त्यामुळे केवळ महाराष्ट्रातून कांदा उत्पादन ११० लाख मे. टन होण्याची शक्यता असून बाजारभाव पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान आज या प्रश्नावर विधानसभेच्या अर्थसंकल्पापूर्वी मोठा गदारोळ उडाला.

आमदार छगन भुजबळ यांनी या विषयावर लक्ष्यवेधी मांडली, त्यात आमदार रोहित पवार, आमदार दिलीप बनकर यांच्यासह अनेकांनी सहभाग घेतला. भावांतर योजना कांद्यासाठी लागू करावी आणि किमान २२०० रुपये प्रति क्विंटल दर मिळावा, तो नाही मिळाला, तर त्यावरील रक्कम भावांतर योजनेअंतर्गत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्यावे असा प्रश्न विरोधी पक्षातील नेत्यांनी मांडला. तसेच निर्यात शुल्क सध्या २० टक्के असून ते तातडीने रद्द झाले, तरच शेतकऱ्यांना फायदा मिळेल अशी मागणीही करण्यात आली.

लोकसभेतही आवाज

या संदर्भात लोकसभेतही आवाज उठविण्यात आला. खासदार भास्कर भगरे यांनी निर्यात मूल्याच्या धोरणासह कांदा बाजारभावाकडे लक्ष वेधून निर्यातमूल्य काढून टाकण्याची मागणी केली. शिपिंग आणि लॉजिस्टीकचे बदल छोटे व्यापारी आणि शेतकऱ्यांसाठी घातक ठरू शकेल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. आयात निर्यात धोरणाचा फटका कांदा आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसतो असेही त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

मागील आठवड्यापासून बाजारभाव घसरत असून आज सोमवारी दिनांक १० मार्च रोजी राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये कांद्याला सरासरी १५०० ते १७०० रुपये दर मिळाल्याचे दिसून आले. आगामी काळात हे दर आणखी घसरून खाली येण्याची भीती व्यापारी आणि बाजारातील जाणकारांनी व्यक्त केली असल्याने तातडीने निर्यात शुल्क हटविणे गरजेचे झाले असल्याचे लोकप्रतिनिधींसह व्यापारी व निर्यातदारांचे म्हणणे आहे. दरम्यान यासंदर्भात आपण लवकरच निर्णय घेऊ असे आश्वासन विधानसभेत बोलताना पणनमंत्री जयकुमार रावल यांनी दिले, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही केंद्राशी चर्चा करणार असल्याचे सांगितले.

केंद्राचा रब्बीचा अंदाज:
यावर्षी खरीप हंगामात 1663.91 लाख मेट्रिक टन अन्नधान्याचे उत्पादन होईल तर रबी हंगामात 1645.27 लाख मेट्रिक टन अन्नधान्याचे उत्पादन होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

हे अंदाज मुख्यतः राज्य सरकारांकडून प्राप्त माहितीवर आधारलेले असतात. उपरोल्लेखित दुसऱ्या आगाऊ अंदाजामध्ये खरीप आणि रबी पिकांच्या उत्पादनाविषयी अंदाज व्यक्त करण्यात आले असून उन्हाळी हंगामातील पिकांच्या उत्पादनाविषयीची माहिती तिसऱ्या आगाऊ अंदाजात समाविष्ट करण्यात येईल.

शेअर करा
Leave a Comment

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *