पीक कर्जाने दिली नवी आशा!

शहादा तालुक्यात मौजे कुसुमवाडीच्या आदिवासी महिला कनीबाई सांबरसिंग ठाकरे यांना जिल्हा प्रशासनातर्फे घेण्यात आलेल्या पीक कर्ज मेळाव्यात 1 लाख 14 हजाराचे कर्ज अवघ्या तीन तासात मंजूर करण्यात आले.

पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांच्या निर्देशानुसार या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी परिसरातील गावातील शेतकऱ्यांनादेखील मेळाव्यात सहभागी करून घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार शहादा तालुक्यातील म्हसावद येथे सेन्ट्रल बँकेने आयोजित केलेल्या मेळाव्याची माहिती तलाठी राजेंद्र रोकडे यांनी कोतवालामार्फत कुसुमवाडीत पोहोचविली. कनीबाई यांना घरपोच माहिती मिळणे हा सुखद धक्का होता.

कनीबाई या 66 वर्षाच्या विधवा आहेत. त्यांना मुलबाळ नसल्याने त्यांनी भावाच्या मुलाला काही वर्षापूर्वी दत्तक घेतले. स्वत:च्या पाऊणे दोन एकर जमिनीवर त्या स्वत: मुलासोबत राबतात. यापूर्वी 1993 मध्ये त्यांनी दीड लाखाचे कर्ज घेतले होते. त्यानंतर ते फेडता न आल्याने कर्ज घेता आले नाही. कष्टाने शेती करून त्यांनी आपला उदरनिर्वाह सुरू ठेवला होता. मागील कर्जमाफी योजनेत त्यांचे जुने कर्ज माफ झाले.

नव्याने कर्ज मिळण्याची आशा तर निर्माण झाली, मात्र अशिक्षित असल्याने कर्ज मिळविण्यासाठी बँकेत चकरा मारणे आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे त्यांच्यासाठी कठीण होते. गेल्यावर्षी लावलेल्या कापसापासूनही फारसे उत्पन्न मिळाले नाही. वर्षभराच्या 40 हजार उत्पन्नात 6 व्यक्तींचे कुटुंब सांभाळून शेतीसाठी बी-बियाणे आणि खत घेणे त्यांना कठीणच होते. अशात मेळाव्याची माहिती मिळाल्याने नवी आशा त्यांच्या मनात निर्माण झाली.

सोमवारी म्हसावद येथील मेळाव्याला त्या आपल्या मुलासह उपस्थित होत्या. त्यांच्याकडून कर्जासाठी अर्ज भरून घेण्यात आला. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर तीन तासात कर्ज रकमेचा धनादेश त्याच ठिकाणी त्यांना तहसीलदार मिलींद कुलकर्णी यांनी सुपूर्द केला. कर्ज मंजूर होताच कनीबाईंचा चेहरा खुलला. ‘आताचा हंगाम चांगला जाणार’ अशी त्यांची उत्स्फुर्त प्रतिक्रिया होती. यावर्षी त्यांनी शेतात ऊस लावला आहे. मिळालेल्या कर्जाने साहजिकच त्यांच्या मनात नवी आशा निर्माण केली….हिरव्या शेताची आणि चांगल्या उत्पन्नाची!

-एका दिवसात कर्ज मिळाल्याने मी खूप खुश आहे. या कर्जाचा उपयोग शेतीसाठी होणार आहे. यापूर्वी कर्जासाठी फिरूनही कर्ज मिळाले नव्हते. माझ्याकडे भाड्यासाठी फारसे पैसे नसल्याने थकून जात होती. कर्ज मिळाल्याने आधार मिळाला आहे, शासनाचे खूपखूप आभार!
कनीबाई ठाकरे

शेअर करा
Leave a Comment

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *